हितगुज स्वत:शीच
अशीच एका लांबच्या ओळखीच्या लग्नाला खूप उशिरा पोहोचले. मुहूर्त तर साधलाच नाही, पण सुलग्नसुद्धा आटोपलेलं होतं. स्टेजवरच्या मंडळींची पांगापांग झालेली, वधू-वर कपडे बदलायला गेलेले आणि एका कोपर्यात सजवलेल्या मखरात गुुरुजींची होमाची तयारी सुरू झालेली होती. मी वर पक्षाकडून हजेरी लावली होती, पण वराचे आई-वडीलही अदृश्य होते. कुणीतरी ओळखीचं भेटेस्तोवर आणि हातातलं पाकीट देईस्तोवर थांबणं भाग होतं. मग काय मी एका कोपर्यातली खुर्ची गाठली आणि निवांतपणे सारी लगबग दुरूनच न्याहाळू लागले. कुठे अहेर देणी-घेणी सुरू होती, कुठे गप्पाष्टक रंगले होते, स्टेजवर लहान मुलांची अक्षता वेचून पुन्हा फेकाफेक सुरू होती, तर शेजारच्या जेवणाच्या हॉलमध्ये विहिणीच्या पंगतीची सजावट सुरू झाली होती. समारंभात असूनही नसण्याचा एक वेगळाच अनुभव घेत मी साक्षीभावानं सोहळा पाहात होते, मला मजा यायला लागली. ‘वर पक्षाकडील मंगळसूत्र आणा’ गुरुजींचा आवाज आला. कुणीतरी लगबगीनं उठलं. पण मंगळसूत्र खूप वेळ आलंच नाही. अचानक कुजबुज सुरू झाली. काहीतरी हरवल्याचा गोंधळ, चेहर्यांवर प्रचंड ताण, शोधाशोध, चिंता, त्रागा या सार्यानं वातावरण तंग झाल...