अर्थाचा अनर्थ

अर्थाचा अनर्थ

अर्थशास्त्र शिकताना आम्हा, भौतिकतेचे मृगजळ दिसले ।
पंथ सुखाचा समजून आम्ही, त्या स्वप्नाला मनी वसविले ।।

त्या स्वप्नाच्या मागे पळता, मनात अमुच्या स्वार्थ जागला ।
'मी अन माझे' ह्या धुंदीतच, हृदयातिल परमार्थ संपला ।।

अर्थाचा हव्यास सरेना,कितीहि मिळता पोट भरेना ।
अर्थासाठी धडपडताना, समाधान आम्हास मिळेना ।।

इतरांशी करताना स्पर्धा, मनःशांतिही हरवुन बसलो ।
दुसऱ्याचे यश सदा आठवत, ईर्षेच्या गर्तेतहि फसलो ।।

नाती गोती नष्ट जाहली, बुद्धी अमुची भ्रष्ट जाहली ।
परस्परातिल विश्वासाची, शुद्ध भावना कलुषित झाली ।।

अर्थासाठी भाऊबंदकी, अर्थासाठी कोर्टकचेऱ्या ।
या अर्थाला खेचून नेण्या, खून दरोडे मारामाऱ्या ।।

विविधरंगि जीवनात अपुल्या, अर्थाला मर्यादा आहे ।
कांचन-मृग परि मनात वसता, सौख्य घराचे हरवू पाहे ।।

कर्तृत्वाची अनंत शिखरे, खुणावती घेण्यास भरारी ।
परि अर्थाच्या वेडापायी, मर्यादित हो क्षमता सारी ।।

प्रेम, दया अन श्रद्धा भक्ती, समाज अपुला अपुली माती ।
लुप्त जाहल्या माया ममता, जगी न उरली सभ्य संस्कृती ।।

सत्य, शुद्धता अन गुणवत्ता, कोण विचारी यांना जगती ।
प्रसार-माध्यम प्रचारतुनि, इथे पसरवी मात्र विकृती ।।

चकाकणाऱ्या प्रलोभनांनी, भले भले आकर्षित झाले ।
मातृभूमिला विसरुन अपुल्या, शत्रूंच्या जाळातही फसले ।।

अर्थवाचून चैन ना पडे, अर्थ कारणे होती झगडे ।
अर्थपायी शोषण होऊन, दुर्बल पडती जगात उघडे ।।

अर्थासाठी टोळ्या बनती, संघर्षाच्या ठिणग्या पडती ।
निरपराध जनतेच्या देखिल,तयात पडती सदा आहुति ।।

अर्थाच्या ह्या ओढाताणित, समाजातली तुटे व्यवस्था ।
निर्लज्जांच्या भ्रष्ट कृतींनी, केविलवाणी इथे अवस्था ।।

या स्पर्धेचा अंत दिसेना, कुठे चाललो कुणा कळेना ।
तेज गतीने धावत असता, विचार करण्या वेळ मिळेना ।।

गिरिशिखरावर चढण्यासाठी, पाऊल पडते जरि कष्टाने ।
रसातळाला जाताना पण, माणुस घसरे अति वेगाने ।।

अर्थ प्राप्तिने मिळे सुबत्ता, अर्थमागूनि येई सत्ता ।
धुंद होऊनी भान सोडता, पतन तयाचे समजा आता ।।

सुखशांती अन समुचित प्रगती, घोर विषमता कमी करावी ।
अर्थासाठी जीवन मूल्ये, राजकारणी नष्ट न व्हावी ।।

मानवतेच्या कल्याणास्तव, अर्थ श्रेष्ठतम 'साधन' आहे ।
अर्थाला परि 'साध्य' मानता, अधोगती ही निश्चित आहे ।।

अति अर्थाने कहर मांडिला, माणुसकीला अर्थ न उरला ।
जगतामाजि लावुनि युद्धे, या अर्थाने अनर्थ केला ।।


- अशोक श्रीधर वर्णेकर

Comments

Popular posts from this blog

सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम्

प्रार्थना

Man and the Nature