हितगुज स्वत:शीच

अशीच एका लांबच्या ओळखीच्या लग्नाला खूप उशिरा पोहोचले. मुहूर्त तर साधलाच नाही, पण सुलग्नसुद्धा आटोपलेलं होतं. स्टेजवरच्या मंडळींची पांगापांग झालेली, वधू-वर कपडे बदलायला गेलेले आणि एका कोपर्‍यात सजवलेल्या मखरात गुुरुजींची होमाची तयारी सुरू झालेली होती. मी वर पक्षाकडून हजेरी लावली होती, पण वराचे आई-वडीलही अदृश्य होते. कुणीतरी ओळखीचं भेटेस्तोवर आणि हातातलं पाकीट देईस्तोवर थांबणं भाग होतं. मग काय मी एका कोपर्‍यातली खुर्ची गाठली आणि निवांतपणे सारी लगबग दुरूनच न्याहाळू लागले.

कुठे अहेर देणी-घेणी सुरू होती, कुठे गप्पाष्टक रंगले होते, स्टेजवर लहान मुलांची अक्षता वेचून पुन्हा फेकाफेक सुरू होती, तर शेजारच्या जेवणाच्या हॉलमध्ये विहिणीच्या पंगतीची सजावट सुरू झाली होती. समारंभात असूनही नसण्याचा एक वेगळाच अनुभव घेत मी साक्षीभावानं सोहळा पाहात होते, मला मजा यायला लागली.
‘वर पक्षाकडील मंगळसूत्र आणा’ गुरुजींचा आवाज आला. कुणीतरी लगबगीनं उठलं. पण मंगळसूत्र खूप वेळ आलंच नाही. अचानक कुजबुज सुरू झाली. काहीतरी हरवल्याचा गोंधळ, चेहर्‍यांवर प्रचंड ताण, शोधाशोध, चिंता, त्रागा या सार्‍यानं वातावरण तंग झालेलं. अचानक एक खुशीनं डवरलेला चेहरा मंगळसूत्राची डबी घेऊन बाहेर आला. सारा ताण निवळून त्याची जागा हास्य, थट्टा, विनोदानं घेतली. पुन्हा एकदा वातावरण मंगलमय, हरवलेलं सापडलं होतं. आधी हरवलं म्हणून नाराजी, तर सापडलं म्हणून सारं राजी झालं होतं.

हे सारं साक्षीभावानं दुरून न्याहाळणार्‍या मला मात्र अचानकच काहीतरी गवसलं. अरेच्या! आपल्याला त्या हरवण्याचं दु:ख नाही तर सापडण्याची खुशीही नाही. जणू तिथल्या राग, लोभ, आनंद खुशी या तरंगाशी माझा काही संबंधच नव्हता. ते सारं भावनांचे तरंग माझ्या आजूबाजूला वाहात होते खरे, पण माझ्या अंतरंगात प्रतितरंग निर्माण करण्यास असमर्थ होते. कारण काय असावं?

त्या गर्दीशी माझं निश्‍चित असं कुठलंच नातं नव्हतं. तिथलं कुणी मला फारसं ओळखतही नव्हतं. मी न कुणाची मुलगी, न पत्नी, न आई, न सखी. माझ्यावर चढलेल्या नात्याच्या झुली तिथे अपरिचित होत्या. तिथे मी एक बिरुद नसलेली स्त्री होते आणि म्हणूनच तिथल्या सुखदु:खानी आंदोलित होत नव्हते.

वाटलं, लहानपणापासून किती बुरखे चढवले आहेत आपण. शिक्षण, पद, पैसा, घराणे, अनेक नाते संबंध, प्रतिष्ठा, खुर्ची, मान सन्मान. या सार्‍या झुलींखाली दडलेलं उपाधीरहित व्यक्तिमत्त्व कसं असेल? या बुरख्यांनाच माझं व्यक्तिमत्त्व मानणार्‍या मला, त्याशिवाय मी कशी दिसते ते ओळखू येईल? किंबहुना या झुली उतरवून स्वत:ला शोधण्याचं सामर्थ्य कधी तरी अंगी बाणेल? त्याशिवाय जगण्याची शक्ती प्राप्त होईल? हेच स्वत:चा शोध घेणं असेल का?

उपाधीरहित स्वत:चं अस्तित्व गवसलं न की मग वातावरणातले सारे विकार, भावनांची आंदोलनं प्रभावहीन होत असणार.

ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात,
म्हणून थोरपण पर्‍हा सांडिजे|
येथ व्युत्पत्ती आधवी विसरीजे
जै जगा धाकुटे होईजे|
तै जवळीक माझी.

अंतरंगातल्या स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी या व्युत्पत्तीच बाधक ठरतात.

या झुलींच्या पाशातून काही काळ का होईना मुक्त होता आलं तर लक्षात येईल की आपला एकच अतूट संबंध आहे, जन्मोजन्मीचा, त्या दिव्यत्वाशी, स्वत:शी.

हा संबंध पुन: प्रस्थापित करण्यासाठी आजूबाजूच्या कोलाहलात हरवून न जाता साक्षी भावानं दुरून बघता यायला हवं, गर्दीत असूनही गर्दीत न गुंतता जगणं शिकायला हवं. कुणी सांगावं, जमेलही कदाचित ...

प्रयत्न मात्र करायलाच हवा, आपलीच आपल्याला ओळख पटवून देण्यासाठी.


- वंदना श्री. वर्णेकर

Comments

Popular posts from this blog

सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम्

प्रार्थना

Man and the Nature