श्रीमद्भगवद्गीतेतील व्यवस्थापनकौशल्य

‘सद्य:स्थितीत श्रीमद्भगवद्गीतेतील प्रबंधन विधीची प्रांसगिकता’ या आगळ्या वेगळ्या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम आर. एस. मुंडले धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयाचे मन:पूर्वक अभिनंदन!

या परिषदेच्या निमित्ताने, व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या व्यवस्थापन या विषयाचं मंथन गीतेतील श्रीकृष्णार्जुन संवादाच्या माध्यमातून घडवून आणण्याचा ‘धाडसी उपक्रम’ यशस्वी झाला.

धाडसी यासाठी म्हणावंसं वाटतं कारण गीतेबद्दल समाजात अनेक सजम-गैरसमज रूढ झाले आहेत. गीतेतील अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र याबद्दल मंथन-चर्चा होताना फार पूर्वीपासून दिसते. त्यामुळेच बरेचदा गीतेतल शाश्‍वत ज्ञानाचा प्रवाह थोर तत्त्वज्ञानी, वयोवृद्ध, चिंतकांपर्यंतच मर्यादित राहून, राष्ट्राचा खरा आधारस्तंभ असलेली तरुण पिढी मात्र गीतेपासून दूरच आहे, हे जाणवतं. गीता हा ग्रंथ सारे भोग भोगून झाल्यावर म्हातारपणी वाचण्यासाठी असून तरुणपणी वाचल्यास मुलं संन्यासी होतील असल्या भ्रामक कल्पनांमुळे देखील युवा पिढी गीतेचा अभ्यास करताना दिसत नाही.

व्यवस्थापनाच्या परिपेक्षातून गीतेचं मंथन घडवून आणून, गीतेतील तत्त्वज्ञान हे व्यवस्थापनकौशल्य, प्रभावी नेतृत्व, कार्य निष्पादन प्रक्रिया, संघटनकौशल्य, नियोजन, अभिप्रेरणा, निर्णयप्रक्रिया या प्रबंधन विषयाशी निगडीत विषयांसाठीसुद्धा दीपस्तंभ ठरू शकेल, हा नवा दृष्टिकोन समाजासमोर आणण्याचा आयोजकांचा उदात्त हेतू मनाला स्पर्श करून गेला.

या परिषदेच्या निमित्ताने प्रकाशित शोधनिबंध पुस्तकातील निबंधांचा मागोवा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, तरुणांना गीतेच्या शाश्‍वत दिव्य प्रवाहाखाली आणण्यासाठी हे मंथन नक्कीच पथप्रर्दशक ठरू शकेल.

निष्काम कर्मयोगाच्या कल्याणकारी मार्गावर चालून, नि:श्रेयस म्हणजे नैतिक उच्चस्थिती व अभ्युदय म्हणजे भौतिक व्यावसायिक प्रगती गाठण्याचा अद्भुत मार्ग गीतेत प्रकट झाला आहे. तो मार्ग तरुणांच्या मनावर बिंबवावा ही व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी काळाची गरज आहे.

गीतेकडे बघण्याचा हा नवा दृष्टिकोन प्रशस्त करण्यासाठी ही भरीव कामगिरी केल्याबद्दल या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनात सहभागी संपूर्ण चमूचं पुनश्‍च एकवार हार्दिक अभिनंदन!


- वंदना श्रीनिवास वर्णेकर
९३७०८०३९१०

Comments

Popular posts from this blog

सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम्

प्रार्थना

Man and the Nature